Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यू आष्टी डेमूच्या अतिरिक्त सेवेचा शुभारंभ; असा होणार फायदा

danve
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (14:49 IST)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या कामांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याला चालु वर्षात 11 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दौंड ते मनमाड, नगर -बीड-परळी या मार्गाचे काम वेगाने पुर्ण करण्याबरोबरच राज्यात रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नगर ते पुणे या डेमू रेल्वेसाठी तांत्रिक बाबींची तपासणी करुन ही रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली .
 
अहमदनगर- न्यू आष्टी या डेमूच्या अतिरिक्त सेवेचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे यांच्या हस्ते अहमदनगर रेल्वे स्थानक येथे आज हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील, बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार बबनराव पाचपुते, आष्टीचे आमदार सुरेश धस, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अलोक सिंग, निरज दोहरे, अरुण मुंडे, भैय्या गंधे आदींची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून नगर-बीड-परळी या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. 261 किलोमीटर असलेल्या या रेल्वे मार्गापैकी नगर ते आष्टीपर्यंतच्या 66 किलोमीटरचे काम पुर्ण करण्यात आले असुन डिसेंबर, 2023 पर्यंत बीडपर्यंतचे काम पुर्ण करण्यात येणार असल्याचेही श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले.
 
नगर ते पुणे प्रवासासाठी रोडने नागरिकांना चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. नगर ते पुणे अशी डेमू रेल्वे सुरु करण्याची जिल्हावासियांची मागणी आहे. या मागणीचा सकारात्मकरित्या विचार करुन ही डेमू रेल्वे सुरु करण्यासाठी तांत्रिक बाबींची तपासणी करण्याच्या सुचना रेल्वे विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. रेल्वे बोर्डाच्या बैठकीमध्ये या बाबींची तपासणी करुन ही डेमू सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
 
भारतीय रेल्वेच्या कामांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले असुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सुविधांनी युक्त अशा वंदेभारत रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. 2023 पर्यंत देशातील सर्व रेल्वेमार्गाचे सिग्नलिंग व इलेक्ट्रीफीकेशनची कामे पुर्ण करण्यात येणार असुन रेल्वेच्या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे यांनी यावेळी दिली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, अहमदनगर वासियांना मुंबईपेक्षा पुणे शहर अधिक जवळ असुन सुलभ व कमी वेळेत पुणे येथे पोहोचण्यासाठी तसेच तरुणांना रोजगाराच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहमदनगर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
 
खासदार डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या, नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग बीड जिल्हा वासियांसाठी अत्यंत जिव्हाळयाचा मार्ग आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रगती पोर्टलवर हा प्रकल्प घेऊन तो पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. केंद्र व राज्य शासनाने या मार्गासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन दिल्याने अहमदनगर ते आष्टीपर्यंतचा मार्ग पुर्ण करण्यात आला असल्याचे सांगत आष्टी ते परळी व नगर ते मुंबईपर्यंत रेल्वेची सेवा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता एकनाथ खडसेही जाणार गुवाहाटीला; स्वतःच दिली माहिती