पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात (बुधवारी) ऑक्सिजन गळती झाली. ऑक्सिजन टँकरमधून प्लांटमध्ये भरताना सेफ्टी वॉल तुटल्यामुळे ही गळती झाली. यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया गेल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे. दरम्यान, या मुळे रुग्णांना पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनमध्ये कोणताही परिणाम झाला नाही.
पिंपरी संत तुकारामनगर येथे महापालिकेचे वायसीएम रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी महापालिकेकडून ऑक्सिजन पुरवठादारांकडून ऑक्सिजन घेतला जातो. टँकरमधून ऑक्सिजन आणून तो ऑक्सिजन प्लांट, जम्बो सिलेंडरमध्ये भरला जातो.
टँकरमधून प्लांटमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरला जात होता. त्यावेळी टँकरचा सेफ्टी ऑल खराब झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे ऑक्सिजन वाया गेला. त्याची नासाडी झाली. त्यानंतर टँकरचा पंप बंद केला. तो दुरुस्त करुन पुन्हा ऑक्सिजन प्लांटमध्ये सोडण्यात आला.
याबाबत वायसीएमचे डॉ. विनायक पाटील म्हणाले, ”टँकरमधून ऑक्सिजन प्लांटमध्ये सोडत असताना वॉल सटकला होता. तो दुरुस्त करुन ऑक्सिजन प्लांटमध्ये टाकला. तत्काळ बंद केल्याने ऑक्सिजन वाया गेला नाही”.
महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, साडे सातच्या सुमारास जेव्हा वायसीएम येथील एका टाकीमध्ये एलएमओ भरला जात होता. तेव्हा टाकीच्या दाबात चढ-उतार झाल्यामुळे दबाव कमी होता. जास्तीत जास्त दाब चालविण्यासाठी व सोडण्यासाठी असलेले सेफटी झडप खराब झाले. पर्यायी सुरक्षित वाल्व्ह त्वरित वापरण्यासाठी ठेवले होते. तथापि, ही टाकीची सुरक्षा यंत्रणा असल्याने टाकीमधून कोणतेही नुकसान झाले नाही किंवा प्रत्यक्ष गळती झाली नाही.
वायसीएममध्ये 300 आंतररूग्ण आहेत आणि त्यात दीड तासाचा बॅक अप आहे. ज्या टँकमधून हा प्रेशर सोडला गेला होता तो ओ2 ते 30 बेडचा आयसीयू आणि100 रूग्ण असलेल्या रुग्णालयाच्या एका मजल्याचा पुरवठा करत होता. ऑक्सिजन सुविधेचे सीओईपीच्या बायोमेडिकल विभागाने ऑडिट केले. सध्या रुग्णालयातील सर्व रुग्ण व टाक्या सुरक्षित आहेत. मी या ठिकाणी भेट दिली आणि त्याची खात्री केली आहे.