लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी महायुतीने 17 जागा जिंकल्या त्यापैकी 7 जागा शिंदे गटाला मिळाल्या.राज्यातील काही अर्बन नक्षल एनजीओ ने महायुतीला निवडणुकीत पराभूत करण्याचे काम करण्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारसभेत बोलताना दिले.
ते म्हणाले, नक्षलवादी केवळ गडचिरोलीतच नाही तर शहरी नक्षलवाद्यांनी एनजीओ मध्ये देखील घुसखोरी केली आहे. तर सरकारच्या विरोधात खोटी कथा तयार करत आहे. त्यांनी महायुती बद्दल खोटे पसरवले.
त्यांचे हे वक्तव्य त्यांनाच भोवले आहे. त्यांना पुण्यातील एका संस्थेकडून कायदेशीर नोटीस आली आहे. या नोटीस मध्ये म्हटले आहे की, त्यांनी अशा एनजीओचे नाव सांगावे अन्यथा जाहीर माफी मागावी.
बी फिअरलेस लोक चळवळीचे एक सदस्य बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आणि शिंदेनी अशा सगळ्या अर्बन नक्षल असलेल्या एनजीओची नावे सांगावी त्यांची माहिती पोलिसांना द्यावी. जनतेसमोर त्या एनजीओची यादी आणावी अशी मागणी केली आहे. त्यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवली आहे.
मुख्यमंत्री या नात्याने शिंदे यांनी प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करणे अयोग्य आहे, विशेषत: महाराष्ट्रातील जनता संकटाचा सामना करत असताना मुख्यमंत्र्यांचे असे बेताल वक्तव्य करणे अयोग्य आहे. कृषी संकट आणि वाढत्या बेरोजगारीशी जनता लढत आहे. अशा संकटावर तोडगा काढण्या ऐवजी असे वक्तव्य करणे बेकायदेशीर आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की शिंदे यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की त्यांना अनेक एनजीओची माहिती आहे ज्या त्यांच्या मते शहरी नक्षलवादी आहेत.
त्यांनी या सर्व स्वयंसेवी संस्थांबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी आणि अशा संस्थांवर कायदेशीर कारवाई करता यावी म्हणून त्यांची जाहीर घोषणा करावी.
त्यांच्या वक्तव्यात तथ्य नसल्यास त्यांनी आपल्या बेजबाबदार आणि खोट्या वक्तव्याबद्दलची राज्याच्या जनतेकडून जाहीर माफी मागावी.असे या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.