महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज (सोमवार, 20 जून) मतदान होणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये थेट लढत या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळेल.
विधानपरिषद निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा चुरशीचा सामना रंगणार आहे.
विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी अपक्षांच्या जोरावर बाजी मारली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पराभव करून त्यांनी तिसरा उमेदवार जिंकून आणला होता. यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार कोण?
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी यांना तिकीट दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवलं आहे.
काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे या दोन वरिष्ठ नेत्यांना पुन्हा संधी दिली आहे.
भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?
भाजपने विधानपरिषदेत पाच उमेदवारांना संधी दिलीय. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली.
भाजपने विधान परिषदेचे विरोधपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना निवडणुकीचं तिकीट दिलंय.
महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ?
राज्यसभा निवडणुकांनतर अवघ्या 10 दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक होतेय. त्यामुळे ही लढत अत्यंत अटी-तटीची मानली जाते आहे.
महाविकास आघाडीतील पक्षांचं एकूण संख्याबळ आहे 152.
शिवसेना- 55
राष्ट्रवादी काँग्रेस- 53
काँग्रेस- 44
विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा उमेदवार जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज भासणार आहे.
महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहाता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. आणि काँग्रेसची ताकद एक उमेदवार सहज जिंकून आणण्याची आहे.
पण काँग्रेसने दोन उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दुसरा उमेदवार जिंकून विधानपरिषदेत पाठवण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त 10 मतांची गरज आहे.
ठाकरे सरकारकडे अपक्षांच्या जोरावर 169 आमदारांचा पाठिंबा आहे. असं असलं तरी राज्यसभेत अपक्षांची मोट बांधण्यात मात्र उद्धव ठाकरे अपयशी ठरले होते.
विधानपरिषद निवडणुकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या सुधारून आम्ही विधानपरिषद निवडणुकीला सामोरं जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सर्व जागा जिंकू."
राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी भाजपच्या पारड्यात झुकतं माप टाकलं होतं. सरकार चालवण्यासाठी अपक्षांचा पाठिंबा असूनही राज्यसभेत अयशस्वी ठरलेले उद्धव ठाकरे विधानपरिषदेत अपक्षांची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का, हा मोठा प्रश्न आहे.
भाजपकडे संख्याबळ पुरेसं आहे?
राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेतही भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नाहीये.
भाजपचे सद्यस्थितीला 106 आमदार आहेत. भाजपसोबतच्या अपक्षांच्या मदतीने संख्याबळ 113 पर्यंत पोहोचतं. त्यामुळे चार भाजपचे उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात.
पाच उमेदवार जिंकवण्यासाठी भाजपला एकूण 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त 22 आमदारांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाचवी जागा लढवणं सोपं नाही हे मान्य केलंय. ते म्हणाले, "सत्तारूढ पक्षात आमदारांमध्ये असलेल्या नाराजीला वाव हवाय म्हणून आम्ही पाचवी जागा लढण्याचा निर्णय घेतला. आम्हाला विश्वास आहे की पाचवी जागा आम्ही निवडून आणू."
राज्यसभा निवडणुकीच्या आकड्यांवर नजर टाकली तर, भाजपला 123 मतं मिळाली होती. 12 अपक्ष आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. हे आकडे लक्षात घेतलं तरी विधानपरिषदेत पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला आणखी 12 मतांची गरज पडणार आहे.