मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. पण अटक केल्यानंतर सुरुवातीला नरमाई दाखवणारे राणे यांनी मुख्यमंत्रीं उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. त्याला जे करायचंय ते करु देत, मला जे करायचयं ते मी करणार असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री पदावर ठाकरे कायम राहणार नाहीत असा टोलाही लगावला आहे.
राणे यांना अटक झाल्यानंतर एका वृत्तवाहीनीबरोबर व्हिडीओ कॉलच्या माध्यमाने त्यांनी संवाद शाधला. यावेळी महिला पत्रकाराने त्यांना उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे असा प्रश्न विचारला होता. त्यावर राणे यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये कुछ नही कहूंगा असे म्हणत उद्धव यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच ते कायम मुख्यमंत्री राहणार नाहीत, अशाप्रकारे जर ते कायद्याचा गैरवापर करत असतील तर आम्ही सुद्धा राजकारणात आहोत असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी आपण जेवत असताना आपल्याला अटक करण्यात आल्याचे सांगितले. तसेच पोलिसांकडे अटक वॉरंट नसताना मला संगमेश्वरात आणलं. त्यांचा हेतू चांगला नसून आपल्या जीवाला धोका असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच मी त्यांना कानाखाली मारेन असं म्हटलंच नसल्याचा दावाही राणे यांनी यावेळी केला.