शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. “शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवं आहे की उपमुख्यमंत्रिपद याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा. तसंच शिवसेनेने हिंमत करून सत्तास्थापनेचा दावा करावा,” असं भुजबळ म्हणाले. “जनतेनं आम्हाला विरोधीपक्षात बसण्याचा कौल दिला आहे, हे यापूर्वीच शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद यापैकी काय हवं ते त्यांनी आधी ठरवलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“राज्यपालांशी चर्चा करताना आम्ही राज्यातील शेतकरी अडचणीत सापडल्याची माहिती त्यांना दिली. राज्यात राष्ट्रपती राजवट जरी लागू झाली तरी ती फार काळ राहणार नाही. येत्या १५ दिवसांमध्ये नवं सरकार अस्थित्वात येईल,” असं सूचक वक्तव्यही भुजबळ यांनी केलं.