Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ विक्रमी वेळेत पूर्ण करु : अजित पवार

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ विक्रमी वेळेत पूर्ण करु : अजित पवार
, बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (10:06 IST)
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. ‘कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त करत या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्यावतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यांचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणारा या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. अवघ्या पाऊणे दोन तासात हे अंतर कापले जाणार आहे.
 
त्याचबरोबर सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार असून या प्रकल्पासाठी चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तळोजा कारागृहातून सुटल्या सुटल्याच गुंड गजानन मारणेवर गुन्हा