सरकारी वैद्यकिय तसेच दंत महाविद्यालयातील दंत व दंतशास्त्र विषयातील अ आणि ब या संवर्गातील पदांना लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यात आली आहेत. या संवर्गातील पदे आता बहुसदस्यीय स्वतंत्र निवड मंडळामार्फत भरली जाणार असून मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजूरी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांमधील अधिकाऱ्यांची भरती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत असल्याने या पदांच्या भरतीला विलंब होत होता. भरतीनंतर अनेक उमेदवार मागणीनुसार पदस्थापना न मिळाल्याने रूजू होत नाहीत. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे रूग्णसेवा आणि शैक्षणिक कार्यक्रमावर विपरित परिणाम होतो. तसेच पदे रिक्त राहिल्याने विद्यापीठाकडून संलग्नता मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही पदे लोकसेवा आयोगाऐवजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अपर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव किंवा सचिव यांच्या अध्यक्षतेखालील बहुसदस्यीय स्वतंत्र निवड मंडळातर्फे भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.