Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाआरोग्य शिबिराची जोरदार तयारी सुरू

महाआरोग्य शिबिराची जोरदार तयारी सुरू
पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री  गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली  १ जानेवारी २०१७ रोजी  गोल्फ क्लब मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिषक कृष्णा यांच्या हस्ते  गोल्फ क्लब परिसरातील ईदगाह मैदान येथे श्रीफळ फोडून मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयायनी फरांदे, सीमा हिरे, डॉ.राहुल आहेर,  पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, डॉ.जी.एम.होले आदि उपस्थित होते.
 
शिबिराच्या पूर्वतयारी अंतर्गत जिल्हाभरात ३१ डिसेंबरपर्यंत आरोग्य सप्ताह राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात १५० प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातून ३२५ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. तर महापालिका क्षेत्रातील ३६ केंद्र आणि राजीव गांधी आरोग्यदायी योजनेअंतर्गत असणारी २२ रुग्णालये तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व रुग्णालयातदेखील तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. त्यातील गरजू रुग्णांची  शिबिरासाठी नोंदणी करण्यात येणार आहे.  गोल्फ क्लब परिसरातील ईदगाह मैदानावर भव्य मंडपाची उभारणी करण्यात येणार असून त्यात तपासणी  विभाग,बाहयरूग्ण्‍ विभाग,तसेच भोजन कक्षही उभारण्यात येणार आहे.
शिबिरात नेत्ररोग, हृदयरोग, आस्थिरोग, जनरल सर्जरी, मेंदुरोग,  बालरोग, किडनी व किडनी संबधी विकार, प्लास्टीक सर्जरी, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, जनरल मेडीसीन, चेस्टीडिसीज, श्वसन संस्थेचे आजार, कर्करोग, ग्रंथीचे आजार, दातांचे विकार मनोविकार, आहार व पोषण, रेडिओलॉजी, त्वचा विकार, अनुवंशीक विकार, लठ्ठपणा व आयुष विभाग आदी २२ विभागात तपासणी व गरजूंवर शस्त्रक्रीयादेखील करण्यात येणार आहे. प्रथमच आयुर्वेद ओपीडी आणि जिनेटीक ओपीडी सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
शिबिरासाठी ग्रामीण भाग तसेच शहरातील विविध प्रभागात वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे. शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्यदायी योजनेअंतर्गत 30 रुग्णालयात १ ते ३१ जानेवारी २०१७ दरम्यान शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झोपड्या पाडा आणि ठाण्याचे स्मशान करा- जितेंद्र आव्हाड