Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यंदाचा मराठी भाषा दिन गेट वे ऑफ इंडियावर

यंदाचा मराठी भाषा दिन गेट वे ऑफ इंडियावर
मुंबई , सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (10:44 IST)

फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन, या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे गेट वे ऑफ इंडियावरील भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच, मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही सादर होणार आहे. तसेच विविध साहित्य-प्रकारांसाठीचे ३३ राज्य वाड्.मय पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती श्री. विनोद तावडे, मंत्री,मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी आज दिली.

सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्री. मारुती चितमपल्ली यांना, श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील भारतीय विचार साधना प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार श्रीमती यास्मिन शेख यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्री. श्याम जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ११ पुस्तकांचे प्रकाशन होत असून, विश्वकोश मंडळाच्या वतीने, ‘पेनड्राईव्हमधील विश्वकोशाचे’ लोकार्पण करण्यात येणार आहे.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने संगणकावरील आणि महाजालावरील मराठी या विषयाला प्राधान्य देणारे विविध उपक्रम कार्यान्वित होत आहेत. आधुनिक काळात कोणतीही भाषा टिकवण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी ‘भाषेचा संगणकावर आणि महाजालावर (इंटरनेटवर) होणारा वापर’, हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक ठरतो आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येकाने महाजालावर मराठीचा वापर वाढविण्याचा आणि प्रत्येक संगणकावर युनिकोड-आधारित मराठी कार्यान्वित करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात, समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) मराठीचा वापर वाढतो आहे. परंतु, या वापराचा वेग आणि व्याप्ती वाढणेही आवश्यक आहे,असे प्रतिपादन श्री. तावडे यांनी केले.

विकिपीडिया हा जगभरातील असंख्य भाषांमध्ये कार्यरत असलेला लोकप्रिय मुक्त ज्ञानकोश आहे. एखाद्या भाषेतील मजकुराची महाजालावरील पृष्ठसंख्या किंवा शब्दसंख्या हा भाषेच्या मोठेपणाचा आणि श्रेष्ठत्वाचा आजच्या काळातील निकष ठरतो आहे. हे लक्षात घेऊनच, मराठी भाषा गौरव दिनी, जगभरातील मराठी भाषकांनी मराठी देवनागरी लिपीतील किमान १ परिच्छेद मजकूर ‘मराठी विकिपीडियावर’ टंकलिखित (टाईप) करावा,असे आग्रही आवाहन श्री. तावडे यांनी या वेळी केले. 

संगणकावर देवनागरी लिपीचे प्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने आणि देवनागरी लिपीच्या वापराच्या सुलभीकरणासाठी युनिकोडप्रणित मराठी संगणकावर कार्यान्वित करण्याचे आवाहनही शासनाकडून करण्यात येत आहे. संगणकाच्या विविध कार्यकारी प्रणालींमध्ये (Operating Systems) मराठी युनिकोड कसे कार्यान्वित करायचे, याची माहिती देणारी चित्रफित तयार करण्यात आली आहे. ही चित्रफित सर्व समाजप्रसारमाध्यमांतून विनामूल्य प्रसारित करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व मराठी संगणक वापरकर्त्यांनी संगणकांवर युनिकोड मराठी कार्यान्वित करून मराठी भाषेच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. तावडे यांनी या प्रसंगी केले.

यंदा मराठी भाषा दिन राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा व ग्रंथालये अशा सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. विकिपीडियावर लेखन व युनिकोडातून मराठी अशा दोन महत्त्वाच्या उपक्रमांसह व्याख्याने, परिसंवाद, स्पर्धा असे विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. राज्यातील ११ विद्यापीठांच्या माध्यमातून, पुणे, सोलापूर,कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, नांदेड,औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक आणि जळगाव या ठिकाणी मराठी भाषेच्या गौरवार्थ,सुमारे ४५० कलाकार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

सोमवार, दि. २७ फेब्रुवारी, २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथील कार्यक्रमासह महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रमांमध्ये त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. विनोद तावडे यांनी शेवटी केले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईतील 6 मार्चचा मराठा क्रांती मूक मोर्चाला तूर्तास स्थगिती