राज्य सरकारने घातलेल्या प्लास्टिक बंदीवर आज उच्च न्यायालय अंतरीम निर्णय देणार आहे. प्लास्टिक उत्पादक संघटनांनी केलेल्य याचिकांवरील सुनावणी गुरूवारी पूर्ण केली. त्यामुळे राज्य सरकारने २३ मार्चच्या अधिसुचनेप्रमाणे लागू केलेली प्लास्टिक बंदी यापुढेही सुरु राहणार की रद्द होणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या आणि प्लास्टिक वस्तू यांचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी असणार आहे. प्लॅस्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी उत्पादकांना तीन महिन्यांची मुदत दिली असली तरी सामान्यांना ती मुदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे सामान्यांनाही तीन महिन्यांची मुदत मिळणार का असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरूवारी केला.