महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, ११ एप्रिल २०२१) रोजी होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२० मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे दिनांक संदर्भिय दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्राकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. तथापि, ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शासानाकडून ऐनवेळी निर्णय घेण्यात आला व तसे आयोगास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले. शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय लक्षात घेऊन रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्राकद्वारे तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या दोन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाकडून घोषित करण्यात आले.
तसेच, कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल व याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, या करिता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील. असे आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.