मुंबईच्या भायखळा कारागृहामध्ये मंजुळाताई शेट्ये या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. कारागृह प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यामुळेच त्यांची हत्या घडवून आणली गेल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. पारदर्शक कारभार म्हणून भाजप पक्ष गवगवा करते. मग गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्रीसुद्धा या अमानुष घटनेला जबाबदार आहेत. या खात्याची जबाबदारी सांभाळणारे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचा राजीनामा सरकार घेईल का? तसेच या हत्येसाठी कारणीभूत असलेल्या कारागृह अधीक्षक व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
कारागृहातील कैद्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाच्या सामानात भ्रष्टाचार होत असल्याची बाब मंजुळा शेट्ये यांनी उघड केली होती. दोन अंडी व पाच पावांचा हिशोब लागत नसल्याच्या किरकोळ कारणावरून कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अमानवी निर्घृण मारहाणीत मंजुळा शेट्येंचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचे वाघ यांनी सांगितले.