निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मराठा समाजाला आरक्षण देऊन आपला राजकीय स्वार्थ साधला आहे. यातून मराठा व ओबीसी समाजात भांडणे लागली आहे, संघर्ष निर्माण होणार आहे, असे मत बहुचन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मातंग समाज सत्ता संपादन एल्गार परिषदे’त अॅड. आंबेडकर बोलत होते.
मंडल आयोगाने ज्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर ओबीसींना आरक्षण दिले, तेच मराठा समाजाला लागू केले आहे. यामुळे ओबीसींमध्ये आमच्या ताटात वाटेकरी निर्माण झाल्याची, भीतीची भावना निर्माण झाली आहे. त्यातून शांत असलेला महाराष्ट्र आता संघर्षांच्या उंबरठय़ावर उभा राहिलेला दिसेल, आरक्षणातून निर्माण झालेली ही कटुता निवडणुकीतून बाहेर पडलेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले.