दररोज वापरणाच्या वस्तूंच्या किमती वाढल्यानंतर आता रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणं देखील महागण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेल दरासह व्यावसायिक एलपीजीच्या दरात झालेली वाढ आणि खाद्यतेलांच्या किमतीतील भडका या सर्व दरवाढींचा फटका आता राज्यातील खवय्यांना बसणार आहे.
राज्यातील रेस्टारंटमधील सर्व खाद्य पदार्थांचे दर तब्बल 30 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील रेस्टारंट मालक संघटनेच्या विचाराधीन असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रेस्टांरंटमध्ये जाऊन चमचमीत खादपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अधिकचे पैसे ग्राहकांना मोजावे लागू शकतात.
व्यावसायिक वापरातील 19 किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलेंडर दरात गेल्या वर्षभरात 500 रुपयांहून अधिक वाढ झालेली आहे. प्रत्येक सहा महिन्यानंतर रेस्टॉरंट चालक स्थानिक पातळीवर किमतीचा आढावा घेत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांत कोरोना आणि लॉकडाऊन कारणास्तव हा आढावा घेण्यात आला नाही. याउलट बहुतांश काळ व्यवसाय बंद असल्याने खर्चात वाढ झाली असून उत्पन्नात प्रचंड घट झालेली आहे.
म्हणूनच नुकसान भरून काढताना व्यवसायात तग धरून राहण्यासाठी पदार्थांच्या किंमतीत वाढ करण्यावाचून दुसरा पर्याय समोर नसल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलांच्या किंमतीत भडका उडाला आहे. रेस्टॉरंटमधील 60 टक्के पदार्थ हे रिफाईंड ऑईलमेध्ये तयार केले जाता अल्यामुळे तेलाचा वापर होणार्या पदार्थांच्या किंमतीत वाढ करण्याची गरज व्यवसायिक व्यक्त करत आहेत.