म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. म्हाडाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. म्हाडाच्या योजनेत घर मिळवून देणाऱ्या दलालाविरुध्द संबंधित विभागाचे मंत्री, पोलीस विभाग, म्हाडा कार्यालयाकडे तक्रार करा असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
स्वत:चे घर शहरात असावे, असे प्रत्येकांचे स्वप्न असते परंतु वाढलेली महागाई, घरांच्या वाढलेल्या किंमती यामुळे घर घेण्याचे नागरिकांचे स्वप्न अपूर्ण राहते. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून काम सुरु आहे. म्हाडाच्या योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना दर्जेदार आणि माफक किंमतीत घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरिकांनी म्हाडाच्या योजनांवर दाखविलेला विश्वास कौतुकास्पद आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.