महाविकास आघाडी सरकरामधील पक्षांच्या नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यामध्ये सर्वांसमोरच बाचाबाची झाली.
दोघांमधील वादाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा तसंच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे अतिवृष्टी झालेल्या नांदगाव भागात दौऱ्यावर होते.पाहणीनंतर छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीतच भुजबळ आणि कांदे यांच्यामध्ये खडाजंगी उडाल्याचं पाहायला मिळालं.
नांदगाव परिसराला गेल्या आठवड्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीनं आपत्कालीन निधी देण्याची मागणी सुहास कांदे यांनी केली. त्यावरूनच या दोघांमध्ये वाद वाढत गेल्याचं पाहायला मिळालं.
तहसिल कार्यालयात झालेल्या या बैठकीत छगन भुजबळ यांनी आपत्कालीन निधी देण्याचं आश्वासन दिलं. पण तातडीनं मदत मिळण्याची मागणी कांदे यांनी केली. त्यासाठी जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल, पण ते तातडीनं शक्य नसल्याचं भुजबळ म्हणाले त्यावर कांदे आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
या प्रकारानंतर सुहास कांदे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी देखील केली. छगन भुजबळ नांदगाव तालुक्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कांदे यांनी माध्यमांशी बोलताना केला.