भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. आता, मनसेकडून या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय. मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरुन कृष्णकुंजवरील भेटीचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत.
उदयनराजे भोसलेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही उदयनराजे मराठा आरक्षणासंदर्भात भेटले होते.
उदयनराजे भोसले यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटी दरम्यान उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरेंना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच कृष्णकुंजवर आल्याने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला, अशी माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आलीय.