राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी अजित पवारांनी सोयीस्कर मौन बाळगल्याची टीका केली आहे. “महाराष्ट्रासमोर इतके प्रश्न आ वासून उभे आहेत. पण महाराष्ट्राचे शॅडो सीएम ज्यांना म्हटलं जातं, ते विरोधी पक्षनेते अजित पवार शांत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकं की राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात प्रकृती बरी नसतानाही शरद पवार उपस्थिती लावतात, पण काही वैयक्तिक कारण सांगून अजित पवार अनुपस्थित राहतात. दया, कुछ तो गडबड है. एवढं मात्र नक्की”, असं गजानन काळे म्हणाले.
दरम्यान, अजित पवार शांत असून राष्ट्रवादी काँग्रेसने गुवाहाटीला जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवावं, असं गजानन काळे आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणाले आहेत. “काल अब्दुल सत्तार सारखा एक मंत्री सुप्रिया सुळे बाबत शिवराळ भाषेत बोलतो, संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा निषेध केला जातो. पण विरोधी पक्षनेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याची साधी प्रतिक्रिया दिसत नाही. कुठल्या माध्यमांकडेही अजित पवारांनी निषेध नोंदवल्याचं दिसत नाही. गुवाहाटीला जाणाऱ्या मार्गाकडे राष्ट्रवादीनं आता लक्ष ठेवावं एवढं नक्की”, असं काळे म्हणाले.
Edited by-Ratnadeep Ranshoor