महाराष्ट्र निवनिर्माण सेना (मनसे) राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका संपूर्ण ताकदीनं लढवणार आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली.
नांदगावकर यांच्या स्वाक्षरीनं काढलेल्या या निवेदनात म्हटलं की, “संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येतं की, आपण आपल्या ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे उमेदवार उभे करावेत आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणावं.”
पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ज्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या संपूर्ण माहितीचा तपशील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला पोस्टाद्वारे आणि ई-मेलद्वारे पाठवावा, असे आवाहनही मनसेकडून करण्यात आलं आहे.