लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने जवळपास ७०० कोटी मंजूर केल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील शेतीलाही याचा फटका बसला आहे. शेतात पुराचे पाणी घुसल्यामुळे प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 701 कोटी रुपये मंजूर
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही मदत जाहीर केली आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत 701 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत दिली जाईल, असं नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या माहितीच्या आधारे अहवाल, शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर
महाराष्ट्र सरकारनं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्रानं आतंर मंत्रालयीन समिती बनवली, समितीनं राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 701 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचं नरेंद्र तोमर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात महापूर, कोकणात होत्याचं नव्हतं, सातारा-सांगली कोल्हापूरलही फटका
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला. इतका पाऊस झाला की कोकणातल्या विविध शहरांत महापूर आला. गावंच्या गावं पाण्यात डुबून गेली. कित्येक घरांवर दरड कोसळल्या. डोंगरकडे कोसळले. यामध्ये तब्बल 110 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. रायगडमधल्या महाडच्या तळीये नावाच्या टुमदार गावाचं स्मशानातृ रुपांतर झालं. एकाचवेळी जवळपास 50 लोकांचा जीव गेला.
दुसरीकडे चिपळूण, खेडमध्ये मुसळधार पावसाने महापूर आला. लोकांची घरं पाण्याखाली गेली. अनेक दुकानांमध्ये पाणी घुसलं. कित्येकांचे संसार उघड्यावर आले. आतापर्यंत कमावलेलं पावसाने एका झटक्यात हिरावून नेलं. चिपळूण खेडमध्येही जिवीत हानी झाली. इकडे सातारमध्येही दरड कोसळून जवळपास 15 लोकांना जीव गमवावा लागला.
सातारा सांगली कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर होता. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर शहरात पाणी शिरलं होतं. नद्यांनी इशारा पातळी, धोक्याची पातळी ओलांडली होती. यामध्ये कित्येकाचं मोठं नुकसान झालंय. सध्या सगळेच आपत्तीग्रस्त मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.