संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी अतिशय आनंदाची वार्ता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मान्सून अखेर महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. मान्सून हा तळ कोकणातील वेंगुर्ल्यात दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांसह जवळपास सर्वच जण आकाशाकडे डोळे लावून मान्सूनची वाट पाहत होते. यंदा मान्सून जूनच्या प्रारंभीच येईल, असे भाकित हवामान विभागाने केले होते. मात्र, ते खोटे ठरले. अखेर आज १० जून रोजी मान्सूनने तळ कोकण गाठला आहे. येत्या काही दिवसातच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या वर्षी ७ जून रोजी मान्सून तळ कोकणात दाखल झाला होता. यंदा तीन दिवस उशिराने मान्सूनने शिरकाव केला आहे.
महाराष्ट्राच्या सर्वच भागात पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. समाधानकारक मान्सून बरसला तर राज्यभरात पेरण्यांना वेग येणार आहे. तूर्त तरी शेतकऱ्यांनी सावधगिरीचे धोरण स्विकारले आहे. अनेकदा पहिल्या पावसानंतर लगेच पेरणी केली जाते. मात्र, त्यानंतर पाऊस दडी मारतो. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट कोसळते. म्हणूनच गेल्या काही वर्षापासून शेतकरी पेरणीसाठी घाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.