महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, मुंबईच्या सिटी पायलट आरोही पंडितने आपल्या कामगिरीने महिलांना मान उंच करुन चालण्यासाठी एक अजून संधी दिली आहे. आरोही पंडितने अटलांटिक महासागरावर एकटीनं उड्डाण भरत सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकावला आहे. आरोहीनं कॅनाडाच्या नुनावुटमध्ये इकालुइट एअरपोर्टवर आपलं विमान लॅंड केलं. यावेळी आरोही ग्रीनलँडसह दोन ठिकाणी थांबली होती.
मुंबईत राहणाऱ्या 23 वर्षांची कॅप्टन आरोही पंडितने अटलांटिक महासागर पार करणाऱी जगातील पहिली महिला ठरली आहे. आरोहीने एका लहान एअरक्राफ्टनं 3 हजार किलोमीटर अंतर पार केलं आहे.
रनवे वर विमान थांबवल्यानंतर विमानातून खाली उतरल्यावर आरोहीनं पहिल्यांदा हातात भारताचा तिरंगा घेत आपल्या यशाचा आनंद साजरा केला. आरोहीने यासाठी सात महिने ट्रेनिंग घेतली होती. ट्रेनिंग घेतल्यानंतर आरोहीनं स्कॉटलॅंडच्या विक येथून कॅनाडाच्या इकालुइटपर्यंत उड्डाण केलं. या प्रवासादरम्यान तिनं आईसलॅंड आणि ग्रीनलँडचा दौरा देखील केला.
या संपूर्ण प्रवासादरम्यान आरोहीने पूर्ण अटलांटिक महासागर पार केले. प्रवासात आरोही एकटी होती आणि यासोबतच ती ग्रीनलँड आइसकॅपवर उड्डाण करणारी पहिली महिला सोलो फ्लाइट पायलट बनली आहे.
एक वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या जागतिक विमान प्रवासाच्या योजनेचा हा एक भाग आहे. एसेसे या सामाजिक संस्थेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे की, या प्रवासादरम्यान आरोहीने विश्वविक्रम केला आहे.
आरोही एलएसए परवानाधारक असून तिने भारतातून उड्डाण केले होते. ती पंजाब, राजस्थान, गुजरातच्या वरून पाकिस्तानात पोहोचली होती. यावेळी 1947 नंतर एलएसए विमान उतरवणारी ती पहिली शेजारी देशातील नागरिक ठरली होती. कॅनडातही तिने विमान उतरवले होते.
तिने उड्डाण केलेल्या एअरक्राफ्टचे नाव माही आहे. ही एक छोटी सिंगल इंजिन साईनस 912 चं एअरक्राफ्ट आहे. या एअरक्राफ्टचं वजन एका बुलेट बाईकच्या वजनापेक्षा ही खूप कमी आहे. स्लोव्हेनिया या देशात या विमानाची निर्मिती करण्यात आली आहे.
आपल्या प्रवासावर प्रतिक्रिया देत आरोही म्हणाली की मला खूप आनंद झाला आहे. आपल्या देशासाठी काही करताना जगातील पहिली महिला ठरल्याचा अभिमान आहे. अटलांटिक महासागर पार करण्याचा अनुभव जबरदस्त होता. तिथे फक्त मी, एक लहान विमान, आकाश आणि खाली जमिनीवर असलेला निळसर समुद्र होता.