शिवसेना ठाकरे गटाते ग्रामिण जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांची आज धक्कादायक पद्धतीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सामिल होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची मनधरणी करण्यात शिवसेनेचे नेते व्यस्त असताना त्याचवेळी त्यांनी राजू शेट्टींवर केलेली परखड टिका चांगलीच भोवली आहे. त्यांच्या टिकेनंतर काही तासातच मुरलीधर जाधवांची त्यांच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीमध्ये यावेत यासाठी आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी सुरु आहे. काल राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवरून बाहेर पडताना राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रात अदानी उद्योग समुहाने जे काही प्रकल्प उभा केले आहेत त्याविरूद्धात जनआंदोलन उभा करणार असल्याचे सांगितले असले तरी महाविकास आघाडीच्या प्रवेशासंदर्भातच चर्चा झाल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छूक असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांच्यावर टिका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाविकास आघाडीमधील प्रवेशाला त्यांनी विरोध केला. अत्यंत शेलक्या शब्दात केलेल्या टिकेवरून जिल्ह्यात चांगलीच चर्चा. राजू शेट्टी हा बेभरवशाचा माणूस आहे. त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना तिकिट न देता माझ्यासारख्या निष्ठावंताना तिकिट द्यावे असे त्यांनी म्हटले होते.
Edited By - Ratnadeep ranshoor