"तुम्हाला नगरविकास खात्याचं मंत्रिपद देतोय तुम्ही 15 तारखेला दिल्लीला या. तसंच एका कार्यक्रमासाठी 1 लाख 67 हजार रुपये ट्रांस्फर करा, " अशी मंत्रिपदाची आॅफर देणारा फोन काॅल काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना आला.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या सुरू असतानाच असा फोन काॅल आल्याने त्यावर पटकन विश्वास ठेवणं कठीणं होतं पण तरीही विकास कुंभारे यांचा सुरुवातीला या आॅफरवर विश्वास बसला.
यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बोलतील असंही कुंभारे यांना सांगण्यात आलं आणि ते 'अध्यक्षांशी' बोललेसुद्धा. हे सगळं विकास कुंभारे यांच्यासाठीही आश्चर्यकारक होतं पण 25 वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असल्याने हे अशक्य आहे असंही त्यांना वाटलं नाही.
जे पी नड्डा यांनी 15 मे रोजी दिल्लीला बोलवलंय असंही फोन करणाऱ्याने सांगितलं आणि कुंभारे यांनी आपलं दिल्लीचं तिकीटही बुक केलं.
परंतु फोन करणा-याकडून एक चूक झाली आणि विकास कुंभारे यांना आपली फसवणूक होत असल्याची शंका आली. भाजपच्या आमदारासोबत नेमकं काय घडलं? 'तो' फोन काॅल कोणाचा होता? मंत्रिपदासाठी भाजपच्या आमदारांनी खरंच लाखो रुपये दिले का? जाणून घेऊया,
'मला खरंच वाटलं की जे पी नड्डा बोलतायत'
नागपूर मध्य मतदारसंघाचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांच्यासह राज्यातील काही 5 ते 6 भाजप आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.
विशेष म्हणजे भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा बोलतायत असं सांगून हे फोन काॅल्स केले जात असल्याची तक्रार नागपूर पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
ते म्हणाले, "मला 7 मे रोजी पहिला फोन आला. सकाळी 10 वाजता अनोळखी नंबरवरून फोन आला. जे पी नड्डा यांचा पीए बोलतोय असं सांगितलं. नड्डा साहेबांचा तुम्हाला 2 वाजता फोन येईल असं ते म्हणाले. मला वाटलं की अध्यक्ष झाल्यावर जसं ते नेत्यांना फोन करतात तसाच फोन मला केला असावा."
विकास कुंभार 2 कधी वाजतील याची वाट पाहत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष फोन करणार म्हटल्यावर निश्चितच महत्त्वाचं काही असणार असा त्यांना विश्वास होता.
कुंभारे सांगतात,
"मी म्हटलं- नमस्ते सर
ते म्हणाले - कैसे हो विकासजी? आपके पास पार्टी की कौनसी जिम्मेदारी है?
मी म्हटलं - विधायक की जो जीम्मेदारी है वो सारे काम मे करता हूँ.
ते म्हणाले - मैने सुना है आपका काम अच्छा है. आपको 16 मे को दिल्ली आना है."
हे संभाषण झाल्यावर तुम्हाला शंका आली नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना कुंभारे सांगतात, "मी यापूर्वी जे पी नड्डा यांच्याशी कधीही फोनवर बोललो नाही. त्यामुळे मी त्यांचा आवाज ओळखला नाही. त्यात जी व्यक्ती बोलत होती तीे एकदम स्टाईलमध्ये बोलत होती. तेव्हा कसलीच शंका आली नाही."
'त्या' एका वाक्यामुळे आमदाराला शंका आली
याच दिवशी (7 मे) संध्याकाळी 5 वाजता विकास कुंभारे यांना पुन्हा फोन काॅल आला.
कुंभारे सांगतात, "मला फोनवर सांगितलं तुमचं अभिनंदन. तुम्हाला आम्ही मंत्रिपद देत आहोत. मी चक्रावलो. तुम्ही 16 ऐवजी 15 मे रोजी दिल्लीत या. मी हो म्हटलं आणि 15 तारखेचं दिल्लीचं तिकीटही बुक केलं."
दुसऱ्या दिवशी विकास कुंभारे नागपूरहून मुंबईकडे रवाना झाले. ते मुंबईला पोहचले आणि त्यांना पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला.
विकास कुंभारे म्हणाले, "मग मला विचारलं की तुम्हाला कुठलं खातं हवंय. मी आधी म्हटलं की तुम्ही जे द्याल ते चालेल. पण त्यांनी पुन्हा विचारल्याने मी सांगितलं की, मी शहरातला आमदार आहे त्यामुळे मला शहरातली सगळी माहिती आहे."
"मग ते म्हणाले अभिनंदन तुम्हाला आम्ही शहरीविकास मंत्री करत आहोत. मला त्यावेळी वाटलं की आपण नगरविकास खातं असं म्हणतो. पण मग मी विचार केला की दिल्लीत शहरीविकास असं म्हणत असावेत."
परंतु या संभाषणादरम्यान जे पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक बोलत असल्याचे सांगणारी व्यक्ती असं काहीतर
म्हणाली की विकास कुंभारे यांना काहीतरी गडबड आहे अशी शंका आली.
विकास कुंभारे सांगतात," देशाच्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक. तो मला म्हणाला की मंत्री बनल्यानंतर आमच्यासारख्या गरीबाला विसरू नका. हे तो बोलल्याने मला शंका आली. कारण नड्डा यांचा पीए असं काही बोलणार नाही असं मला पक्क वाटलं. मग मी ही बाब नेत्यांना सांगायचं ठरवलं."
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी विकास कुंभारे मुंबईत सरकारी अतिथीगृह सह्याद्री येथे पोहचले. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना खासगीत भेटता न आल्याने त्यांना हा प्रकार सांगता आला नाही असं कुंभारे सांगतात.
"त्यादिवशी सह्याद्रीवर खूप गर्दी होती. हा विषय सगळ्यांसमोर बोलता येण्यासारखा नाही म्हणून मी काहीच बोललो नाही. मुंबईहून नागपूरला परत जात असताना फ्लाईटमध्ये माझी भेट नितीन गडकरी यांच्या पीएशी झाली. त्यांना मी सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करायचं ठरवलं." असंही कुंभारे यांनी सांगितलं.
1 लाख 67 हजारांची मागणी
विकास कुंभारे यांनी या प्रकरणाची तक्रार गेल्या आठवड्यात नागपूर पोलीस आयुक्तांकडे केली.
प्रत्येक फोन काॅल रेकाॅर्ड करायचe असंही त्यांनी ठरवलं. या दरम्यान आलेले काही फोन काॅल्स आपण टाळल्याचं ते सांगतात.
"यानंतर पुन्हा फोन आला. ते म्हणाले की कर्नाटक निकाल विरोधात जाण्याची शक्यता आहे. आपल्याला यात जुगाड करावा लागेल. नंतर सांगितलं की गुजरातमध्ये कार्यक्रम ठेवला आहे. काही जणांच्या जेवणाची सोय करायची आहे. मग असं सांगत त्यांनी पैश्यांची मागणी केली." असं कुंभारे म्हणाले.
" गुजरातमध्ये कार्यक्रमासाठी 1 लाख 67 हजार हवे असल्याने तुम्ही तातडीने मी पाठवलेल्या लिंकवर पैसे पाठवा असं ते म्हणाले. मी त्यांना म्हटलं की बाहेरगावी आहे. माझा माणूस पैसे पाठवेल. मी पैसे पाठवले नाहीत म्हणून पुन्हा फोन आला की साहेब नाराज होतायत,"
या दरम्यान, विकास कुंभारे यांनी नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
कुंभारे सांगतात," देवेंद्र फडणवीस यांना सर्व प्रकार सांगितल्यावर, त्यांनी सांगितलं की आणखी काही आमदारांना असे फोन काॅल्स आले आहेत. आयुक्तांशी बोलल्याचंही ते म्हणाले."
अहमदाबाद येथून आरोपी ताब्यात
विकास कुंभारे यांनी नागपूर पोलीस आयुक्तालयाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित फोन ट्रेस करून पोलिसांनी अहमदाबाद येथील मोरबी या ठिकाणाहून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
माध्यमांशी बोलताना पोलीस उपायुक्त सुदर्शन यांनी सांगितलं, "आमिष दाखवण्यासाठी मंत्रिपद मिळेल असं त्यांना सांगितल्याची तक्रार आमदार विकास कुंभारे यांनी केली आहे. संघाचं शिबीर घेत आहोत गुजरातमध्ये म्हणून पैसे मागितले. आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे.आणखी किती जणांना असं फसवलं आहे याचा तपास घेत आहोत."
'आवाजाची फाॅरेन्सिक चाचणी करा'
भाजप आमदारांकडे खूप पैसे असल्यानेच सापळा रचला गेला अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, "मला वाटतं महाराष्ट्रातील भाजप आमदारांकडे खूप पैसे आहेत म्हणून त्यांनी सापळा रचला असावा. पण गरीब आमदार बिचाऱ्याच्या गळ्याला लागले. आमदारांबाबत ही जी प्रवृत्ती आहे त्याचा वेळीच बंदोबस्त केला गेला पाहिजे."
तर हा आवाज खरा होता की खोटा होता याची तपासणी फाॅरेन्सिक प्रयोगशाळेत व्हावी अशी मागणी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले," भाजप नेत्यांच्या घरात काही लोक घुसतात तरी त्यांना दहा वर्षं पत्ता लागत नाही. नवाब मालिकांना जेलमध्ये टाकलंय. पण त्यांनी आरोप केले त्याचं काय झालं तुम्ही बघताय.अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकल. आता परमबीर सिंहांना क्लिन चीट दिली. 100 कोटी गेले कुठे मग?"
"ह्या कारणांमुळे पारदर्शकता म्हणून जेपी नड्डा यांच्या नावाने जो फोन आला त्याची चाचणी व्हायला हवी. आवाज त्यांचा आहे असं मी म्हणत नाही, "