राज्यात ओबीसी आरक्षाविना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या 45 जागांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी आणि 195 ग्रामपंचायतींमधील 209 जागांवर झालेल्या निवडणुकीचेही निकाल आज लागतील.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं 15 डिसेंबर 2021ला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठीचा आदेश दिला.
या आदेशानुसार नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मागासवर्ग प्रवर्गाच्या अनारक्षित जागांसाठी काल मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान झालं होतं.