नागपंचमीच्या निमित्तानं जिवंत सापांची पूजा आणि प्रदर्शन यावर लावलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयानं यंदाही कायम ठेवली आहे. दरवर्षी नागपंचमीला हजारो जिवंत साप पकडले जातात आणि मोठ्या क्रुरतेनं हाताळले जातात. या कारणामुळे तीन वर्षांपूर्वी हायकोर्टानं सापांच्या पूजेवर बंदी आणली होती. साताऱ्यातील बत्तीस शिराळा गाव हे नागपंचमीला होणाऱ्या पूजेसाठी प्रसिद्ध होतं. मात्र नागपंचमीच्या निमित्तानं हजारो सापांची शिकार होत असे. ही प्रथा ताबडतोब बंद करुन नागरिकांमध्ये सापांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले होते.
हायकोर्टाच्या आदेशांनंतर वन विभागानं ही प्रथा बंद पाडली. या आदेशांचा पुनर्विचार करण्याकरता सामाजिक कार्यकर्ता प्रदीप जोशी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.