कराड तालुक्यातील वसंतगडचे सुपुत्र नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर यांचे कारगीलमधील लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत हुतात्मा झाले. भारतीय सैन्य दलातील इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कार्यरत असलेले उकलीकर हे 38 वर्षांचे होते. या घटनेचे वृत्त समजताच वसंतगड परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव विमानाने पुण्यात व तिथून वसंतगड येथे उद्या गुरुवारी येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, आर्या ही सहा वर्षाची मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
बर्फाच्छादीत शिखर सर करण्याचे प्रशिक्षण सन 2008 मध्ये यशस्वीपणे पूर्ण केलेले सुभेदार शंकर उकलीकर सध्या मथुरा मिल्ट्री स्टेशनमधील बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपमधील 112 इंजिनीयर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. दिल्लीतील सैन्य दलाच्या मुख्यालयातून 40 जवानांना लेहमध्ये पाचारण करण्यात आले. इथल्या बर्फाळ प्रदेशात अचानक दुर्घटना घडून 9 सैनिक गाढले गेले. त्यातील तिघांचे पार्थिव मिळून आले. त्यात शंकर उकलीकर यांचा समावेश आहे.
शंकर उकलीकर यांचे प्राथमिक शिक्षण वसंतगड येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी पुढील शिक्षण कराडी येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात घेतले. 2001 साली ते सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलात त्यांनी 22 वर्ष राष्ट्र रक्षणाचे कर्तव्य बजावले.