Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नारायण राणेंना अटक होणार? मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका वादाच्या भोवऱ्यात

नारायण राणेंना अटक होणार? मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका वादाच्या भोवऱ्यात
, मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (09:23 IST)
मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाबाबत राणे यांनी केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
 
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे विरुद्ध शिवसेना हा वाद उफाळून येण्याची चिन्हं आहेत.प्रत्येक जिल्ह्यात आणि वॉर्डात राणेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची तयारी शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी केली आहे,अशी माहिती समजत आहे.
 
महाड,नाशिक नंतर पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राणे सध्या चिपळूणमध्ये आहेत.तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व शांतता बाधित होईल असे चिथावणी देणारे वक्तव्य दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.नाशिक पोलीस आयुक्त यांनी नारायण राणे यांना अटक करावी असे आदेश काढले.नारायण राणेंविरोधात कलम 500, 502, 505, 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे. सोमवारी राणे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. शिवसेना नेते,कार्यकर्त्यांनी यांनी हे वक्तव्य गांभीर्याने घेत कारवाई करण्याची मागणी केली.
 
अशा वक्तव्याप्रकरणी कारवाई करता येते का याबाबत कायदेशीर चाचपणी केल्यानंतर शिवसेना नेत्याने सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
 
नारायण राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून,असं वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद शिवसैनिकां मध्ये आहे हे त्यांनी विसरु नये,अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
 
राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक रवाना झाल्याचं वृत्तही समोर येतं आहे. केंद्रीय मंत्रीपदी असलेले राणे सध्या जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांना भेट देत आहेत. यात्रेदरम्यान राणे यांनी शिवसेनेवर,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली होती.दरम्यान युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहू येथील घराबाहेर जमण्याचे आदेश दिल्याचं समजतं.मुंबई पोलिसांनी त्यांना थांबवावं अन्यथा काही घडलं तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.सिंहाच्या गुहेत शिरण्याचा प्रयत्न करू नका.आम्ही वाट बघत आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
राणे यांच्या वक्तव्यानंतर कोंबडी चोर अशी पोस्टर्स दादर भागात लावण्यात आली होती. त्यावर नारायण राणेंचा फोटो होता.पोलिसांनी पोस्टर्स हटवली आहेत.
 
काय म्हणाले होते राणे?
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले.त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला.हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले.
 
"बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल.त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं",असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.
 
"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चिड येणारी गोष्ट आहे,असंही राणे म्हणाले.सरकार कोण चालवतंय ते कळत नाही,सरकारला ड्रायव्हरच नाही",अशी टीका देखील त्यांनी केलीय. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे,असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.
 
राणेंची बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट आणि शिवसैनिकांकडून शुद्धीकरण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी (गुरुवार,19ऑगस्ट) मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं.मात्र, राणे निघून गेल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी स्मृतिस्थळाचं गोमूत्र आणि दुधानं शुद्धीकरण केल्याची माहिती समोर येत आहे.
 
या प्रकारामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पक्षाने या गोष्टीचा निषेध केला आहे.
 
केंद्रीय मंत्री राणे यांनी गुरुवारी बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार आहे,असं जाहीर केल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेकडून विरोध झाला होता.
 
'एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये घेऊ'
"एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत.त्यांना आम्ही आमच्यात घेऊ,"असं राणे म्हणाले काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
 
"एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सहीपुरते आहेत. 'मातोश्री'शिवाय ते एकही सही करू शकत नाहीत.ते कंटाळले आहेत.आमच्याकडे आले तर घेऊ,असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू," असा दावा राणेंनी या वेळी केला.
 
'सीएम-बीएम गेला उडत,आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका'
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान कुणीही अधिकारी उपस्थित नसल्यानं, राणेंनी संताप व्यक्त केला होता.तो सीएम बीएम गेला उडत.आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे.इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का?"असं राणे म्हणाले होते.
 
जनआशिर्वाद यात्रेतले मंत्री बाटगे; सामनातून राणेंना टोला
मोदी सरकारने त्यांच्या मंत्र्यांची जन आशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्या जत्रेत विरोधकांना शिव्याशाप देण्याचं काम सुरू आहे.
 
या जनआशिर्वाद यात्रेतले अर्धे मंत्री हे विचार आणि आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत.म्हणजे काल परवा भाजपमध्ये घुसले आणि मंत्रिपदाची हळद लावून बोहल्यावर चढले.
 
हे उपरे भाजपचा प्रचार करत आहेत.वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते या जत्रेत येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत. सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर टीका करण्यात आली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार