Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक: ठाकरे गट फुटल्यानंतर बंदोबस्त आणि जल्लोष

mumbai police
, शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (15:29 IST)
नाशिक : शिवसेनेला (ठाकरे गट) सोडचिठ्ठी देत शिंदे गटात दाखल झालेल्या अजय बोरस्ते यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे तब्बल ११ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिक मध्ये ठाकरे गटाला खिंडार पडला आहे. त्यांमुळे शहरात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अशात ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या बोरस्ते यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

एकीकडे बोरस्ते यांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर दुसरीकडे ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे नाशिकच्या बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात जल्लोष साजरा केला जात आहे. फटक्याची आतिषबाजी आणि अजय बोरस्ते यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जात आहे. तर ठाकरे गटाला धक्का तर शिंदे गटात आनंद असं चित्र सध्या नाशिकच्या राजकरणात पाहायला मिळत आहे.
 
एकनाथ शिंदे गटाने नाशिकचा ठाकरे गटाचा गडाला हादरवले असून नगरसेवकांचा मोठा गट शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा खरी ठरली. शिवसेनेचे ११ माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहे. आज (दि. १६) वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात या सर्व नगरसेवकांनी प्रवेश केला. संजय राऊत यांनी नाशिकमधून पाठ वळवताच सेनेला मोठा धक्का बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये या घडामोडी घडत आहेत.
 
महापालिकेच्या (NMC Nashik) माजी विरोधी पक्ष नेत्यासह ११ जणांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करत नाशकात ठाकरे गटाला मोठी खिंडार पाडली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा धक्का मोठा मानला जात आहे. काल-परवा संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना आज या हालचाली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमधून अजय बोरस्ते (विरोधी पक्षनेते माजी), सूर्यकांत लवटे (माजी नगरसेवक), सुवर्णा महाले, आर. डी. धोंगडे, ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खर्जुल, प्रताप मेहरोलीया, सचिन भोसले, चंद्रकांत खोडे, पूनम मोगरे, राजू लवटे या सर्वांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे.
 
राज्यभर शिंदे गटात आजी-माजी नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांची इनकमिंग होत असताना नाशकात मात्र ठाकरे गट मजबुतच होता. याची स्तुती थेट नाशिकचे सेनापती संजय राऊत यांनी देखील केली होती. मात्र आता नाशिकमधील ११ नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यांनी काल मुंबईला रवाना होत नाशकात देखील ठाकरे गटाला मोठा खिंडार पाडला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

द्राक्षबागेवर अज्ञात व्यक्तीचा घाव; सत्तर झाडे मुळापासून तोडून टाकली