नाशिक जवळ समृध्दी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भरवीर-शिर्डी या दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.
२ जून रोजी याच महामार्गावर तीन जणांना अपघातात जीव गमवावा लागला होता. यानंतर पुन्हा अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. सततच्या होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता आहे की मृत्यूचा सापळा असा प्रश्न विचारला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगात असलेली इनोव्हा कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले आहेत.
हे सर्व जण शिर्डी येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर बघ्यांचीही मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहयला मिळालं.
मध्यरात्री इनोव्हा कारवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कारने महामार्गावरील कठड्याला जोरदार धडक दिली.मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण हज यात्रेसाठी निघालेल्या नातेवाईकांना मुंबईला सोडून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
चार जणांचा मृत्यू, चार जखमी
दरम्यान या अपघातात रज्जाक अहमद शेख, सत्तार शेख लाल शेख, सुलताना सत्तार शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर फैयाज दगुभाई शेख यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख, मैरूनिसा रज्जाक शेख, अझर बालन शेख, मुस्कान अजर शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. सिन्नर येथे प्राथमिक उचारानंतर जखमींना तातडीने शिर्डी येथे पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor