नाशिक पिंपळगाव बसवंत मोबाईल चोरी, दुकान फोडी तसेच, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चक्क पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर ग्रामपंचायत सदस्याची कार जाळल्याच्या प्रकरणात सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला फरार संशयित आरोपी गुंग्या भाईच्या २४ तासाच्या आत मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला व्यसन घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
संशयित आरोपी गुंग्या भाई गेल्या कित्येक महिन्यांपासून मोबाईल चोरी, दुकान फोडी, तर शेतकऱ्यांचे कांदे ट्रॅक्टरमधून चोरी करीत होता. पिंपळगाव बसवंत शहरात मोबाईल चोरीमध्ये तर गुंग्याने कळस गाठला होता. दररोजचे दोन – चार मोबाईल तो सहज आठवडे बाजारातून व गर्दीतून चोरी करीत. त्यात मोबाईलला कितीही मास्टर लॉक असो तो चलाखीने तोडत असे. शहरात मोबाईल चोरी गेला की गुंग्याने चोरला, अशा तक्रारींचा भडिमारच नागरिकांकडून वारंवार होत होता.
त्याने पोलीस ठाण्यासमोरील ऋचा हॉटेलजवळच ग्रामपंचायत सदस्याच्या कारला पेटलेल्या टायरच्या सहाय्याने पेटवून दिल्यानंतर पिंपळगावकर संतप्त झाले अन् शेवटी पोलिसांनी गुंग्याला बेड्या ठोकल्या.
पिंपळगाव पोलीस ठाण्यासमोरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच कार पेटवून फरार आरोपी गुंग्याची पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली व त्याला २४ तासाच्या आत बेड्या ठोकत पोलीस ठाण्यात कैद केले.
Edited By- Ratnadeep Ranshoor