नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झालाय. या मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.
छगन भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर म्हटलं की ही अतिशय दु:खद घटना आहे. करोनाशी लढा सुरू असताना अशी दुर्घटना होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारकडून 3 सदस्यीय समितीची स्थापना केली गेली आहे. यात एक आयएएस अधिकारी, एक इंजिनिअर आणि एका डॉक्टरचा समावेश आहे.
ऑक्सिजन कसा लीक झाला याची समितीच्या मार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असं भुजबळ यावेळी म्हणाले.