Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक: गोळीबार करणारा नगरसेवकपुत्र ताब्यात

arrest
, शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (14:59 IST)
नाशिक: मागील वर्षी साजर्‍या करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या खर्चाचा हिशेब मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पिस्तूल काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणारा माजी नगरसेवकपुत्र स्वप्नील सूर्यकांत लवटे (वय ३२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी, की देवळाली गाव सार्वजनिक पार येथे काल सायंकाळी शिंदे गटाने शिवजयंती साजरी करण्यासाठी बैठक बोलावली होती. ही बैठक सर्वपक्षीय समितीची असल्याचे निदर्शनास आले असता ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी त्यावर आक्षेप घेत शिंदे गटाबरोबर आम्ही जयंती साजरी करणार नाही, त्यामुळे सर्वपक्षीय हा आशय काढून टाकावा, अशी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये वादविवाद व शिवीगाळ झाले. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने बंदुकीतून हवेत गोळीबार केला.
 
गोळीबार होताच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धावपळ होऊन तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने देवळाली गावातील दुकाने पटापट बंद झाली. ही माहिती पोलिसांना समजताच नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले पोलीस उपायुक्‍त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्‍त सिद्धेश्‍वर धुमाळ, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
 
कानोकानी गोळीबार घटनेची माहिती मिळाल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटानास्थळी पोहोचून गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला; मात्र ती कमी होत नसल्याने पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज केला. पोलिसांनी माजी नगरसेवकपुत्र स्वप्नील लवटे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गांजाच्या नशेत तरुणाचा दगडाने ठेचून खून; चौघांना अटक