राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात पुरपरिस्थिती उद्भवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय मुंबईसह राज्यातील अनेक भागातील शाळांना सुट्ट्या देखील देण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडे नाशिकला पावसाने सतत हुलकावणी दिली आहे. ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. तर काही वेळा मुसळधार सरी कोसळत असल्याने इगतपुरी तालुक्यातील धरणे भरली आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
गंगापूर धरणातून शुक्रवारी दुपारी 12 वाजता 539 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल, असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले. गंगापूर धरण तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा जोर चांगला असल्याने गंगापुर धरणासाठ्यात वाढ होत आहे. आजमितीस गंगापूर धरणात 69 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे धरणतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. भावली धरण 100 टक्के भरले असून त्यातून 701 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर दारणा धरण 78 टक्के भरले असल्याने त्यातून 6569 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या या धरणामधून 3955 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अद्यापही नाशिक जिल्ह्यातील 24 प्रकल्पापैकी 13 धरणे 50 टक्क्यांच्या खाली आहेत.
Edited By - Ratnadeep Ranshoor