शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मुलींचे फूस लावून अपहरण करण्यात आल्याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अपहरणाचा पहिला प्रकार जेलरोड परिसरात घडला. फिर्यादी महिलेची मुलगी ही दि. १ मे रोजी सकाळी ७ वाजता घरात पाणी भरत असताना कोणासही काहीही न सांगता कुठे तरी निघून गेली आहे.
ती यापूर्वीदेखील दोन वेळा घरातून कोणासही काहीही एक न सांगता निघून गेली होती.ती काही दिवसांनी परत आली; मात्र दि.१ मे रोजी निघून गेल्यानंतर ती अद्याप घरी परतली नाही. तिचा परिसरात मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
त्यामुळे फिर्यादी महिलेची खात्री झाली, की तिला कोणी तरी अज्ञात इसमाने फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेले म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बकुळे करीत आहेत.
अपहरणाचा दुसरा प्रकार राजराजेश्वरी चौकानजीक घडला. फिर्यादी महिलेची मुलगी ही दि. १ मे रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घरी होती. त्यादरम्यान आरोपी केतन आढाव (रा. दसक गाव, जेलरोड) याने या मुलीला काही तरी फूस लावून फिर्यादी मुलीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित केतन आढावविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
अपहरणाचा तिसरा प्रकार चुंचाळे येथे घडला. फिर्यादी महिलेच्या मुलीला राहत्या घरातून दि. २ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास दत्तनगर येथून अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. तसेच फिर्यादी महिलेच्या कायदेशीर रखवालीतून अपहरण केले म्हणून अज्ञात इसमाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.