गुगल पे अकाऊंट अनब्लॉक करण्याचा बहाणा करून अज्ञात इसमाने एका तरुणाच्या बँक खात्यातील सुमारे पावणेतीन लाखांची रोकड ऑनलाईन काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संजय छनूलाल सेऊत (वय 25, रा. पार्वती चौक, कामगारनगर, सातपूर) असे ऑनलाईन फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संजय सेऊत या तरुणाला 9564039619 या क्रमांकावरील अज्ञात मोबाईलधारकाने फोन केला. त्याने सेऊत यांना गुगल पे अकाऊंट अनब्लॉक करण्याचा बहाणा केला. त्यानिमित्ताने अज्ञात मोबाईलधारकाने सेऊत यांच्या बँकेच्या डेबिट कार्डाची माहिती विचारली, तसेच बँक व्यवहाराबाबतची माहिती विचारून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. 18 ते 21 एप्रिल यादरम्यानच्या कालावधीत अज्ञात मोबाईलधारकाने फिर्यादी सेऊत यांच्या बँक खात्यातील 2 लाख 71 हजार 102 रुपयांची रक्कम इंटरनेट व फोनद्वारे ऑनलाईन काढून फसवणूक केली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल-धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Edited By - Ratnadeep Ranshoor