एकनाथ खडसे २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना, नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असून आमचे मार्गदर्शक आहेत. सर्वांचा हिरमोड होईल, पक्षाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु असून पुन्हा ते उत्साहाने सहभागी होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधिय् जाणार असल्याच्या चर्चा सुरु असताना चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे. यामुळे नाथाभाऊ लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं नक्की झालं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच ते पुन्हा एकदा उत्साहाने सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते पुण्यात बोलत होते.