नवाब मलिक यांच्या जावयाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. मात्र, त्यांची मुलगी निलोफर यांनी एक खुलं पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. कुटुंबाला आलेल्या अडचणींचा उल्लेख त्यांनी यात केला आहे.
'फ्रॉम द वाइफ ऑफ अॅन इनोसंट, द बिगनिंग' असं शीर्षक निलोफर यांनी या पत्राला दिलं आहे. निलोफर यांचे पती आणि नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्यावरील एनसीबीच्या कारवाईमुळं कुटुंबावर आलेल्या संकटाबाबत त्यांनी पत्राद्वारे सांगितलं आहे.
पती समीर खानला एनसीबी अटक केल्यानंतर कुटुंबाला दिलेली वागणूक ही 'अन्याय्य आणि बेकायदेशीर' असल्याचं निलोफर यांनी म्हटलं.
'या प्रकारानंतर आमच्या कुटुंबाला जणू वाळीत टाकलं. पेडलरची बायको, ड्रग स्मगलर अशा शब्दांचा आम्हाला सामना करावा लागला. माझ्या मुलानं मित्र गमावले,' असं निलोफर यांनी या पत्रात म्हटलं आहे.
'पुरावे नसतानाही पतीला आठ महिने तुरुंगात राहावं लागलं,' असंही निलोफर यांनी म्हटलं आहे.