शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला व युवती कार्यकर्त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर कांदे फेकत घोषणाबाजी केली. पुणे जिल्ह्यातील राहू (ता.दौंड) येथील शेतकरी दत्तात्रेय शिंदे यांच्या शेतातील कांदे कार्यकर्त्यांनी दालनात फेकले.
कांद्याला मिळणारा कवडीमोल हमीभाव तसेच बाजारभावापेक्षा वाहतुकीचा होणारा अधिकच खर्च यामुळे पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून आपल्या शेतातील कांद्याचे उभे पिक ट्रॅक्टरने जमिनीत गाडून टाकल्याची घटना नुकतीच घडली. दि.२७ एप्रिल २०१७ रोजी खासदार सुप्रियाताई सुळे या त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर असताना दौंड परिसरातील शेतकरी कांद्याचे उभे पीक जमिनीत गाडत असल्याची माहिती त्यांना समजली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेत शेतकऱ्यांची भेट घेतली होती. याधीही नाशिकमधल्या नगरसूल येथेही एका शेतकऱ्याने पाच एकरवरील कांदा जाळून टाकला होता. त्यावेळीही खासदार सुप्रिया सुळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र लिहून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दाहक स्थिती शासनासमोर मांडली होती.