Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग..पवार, भुजबळ, जयंत पाटील सर्व उपस्थित

भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग..पवार, भुजबळ, जयंत पाटील सर्व उपस्थित
महाड येथे चवदार तळ्याचे घेऊन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्चन यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ झाला. महाड य़ेथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सरकारविरोधात टीकेची तोफ डागत आता परिवर्तन होणारच हा नारा दिला.
 
भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? हा प्रश्न समाजातील सर्वच स्तरातील लोक आता विचारत आहेत. लोक प्रश्न विचारतील, निषेध करतील म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांच्यावेळी लोकांना तुरूंगात डांबले जात आहे. धर्माबाबाच्या पत्नीची मुख्यमंत्र्यांना काय भीती होती. त्यांना तुरुंगात का टाकण्यात आले...? असा सवाल या सभेत प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी विचारला. यावेळी जयंत पाटील यांनी युतीतील शिवसेनेवर देखील टीका केली. भाजपा अध्यक्ष अमित शहा “शिवसेना को हम पटक देंगे़” असे म्हणाले. स्व. बाळासाहेब ठाकरे आज असते तर काय हाल झाले असते अमित शाहंचे..? शिवसेना भाजपमध्ये इतके मतभेद असतील तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना का भेटायला गेले होते? असा प्रश्न करत या नौटंकीबाजांना हरवण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
 
रायगड मध्ये पहिल्या सभेलाच प्रचंड गर्दी झाली आहे. लोकांचा असंतोषच यातून दिसत आहे, आता थांबायचे नाही. आता मागे पाहायचे नाही, परिवर्तन घडवायचेच, अशी गर्जना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी केली. राष्ट्रीय भाजप सरकारने इतके वर्षे फक्त लोकांची फसवणूक केली. या भागातील मंत्री अनंत गीते हे ‘अवजड मंत्री आहेत की अवघड मंत्री’ काहीच कळत नाही. एक कारखाना त्यांनी इथे आणला नाही, इथले रस्ते नीट नाही, याउलट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे  यांनी नेहमीच या भागाचा विचार केला आहे, असे पवार म्हणाले.
 
ज्या महापुरुषांनी राज्यक्रांती केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून परिवर्तनाची सुरुवात आम्ही केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर स्वराज्याची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे मनुस्मृती दहन करून क्रांतीची सुरुवात केली. तिथूनच आज परिवर्तनाची सुरूवात करूया, असे प्रतिपादन जेष्ठ नेते छगन भुजबळ नी केले. भाजपच्या या हिटलरशाही सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच हरवू शकतात असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.
 
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की देशात चोरांचं सरकार आहे, सरकारमधील लोक नालायक आहेत, मग जे शिवसेनेचे मंत्री सत्ता उपभोगत आहे ते कोण आहेत? असा सवाल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात जी विकासकामे केली त्याला नेस्तनाबूत करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. रायगडचे खासदार अनंत गितेंनी या परिसरात काहीच काम केले नाही. गितेंनी रायगडवासियांची फसवणूक केली आहे, अशी टीका देखील तटकरे यांनी केली आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी परिवर्तनासाठी रायगडाची निवड केली त्याच रायगडावरून भाजपाचे जुलमी सरकार घालवण्यासाठी परिवर्तनाला सुरवात होत आहे. मागील साडेचार वर्षात भाजप सरकारने पदोपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. शिवस्मारकाची अजून एकही वीट ठेवली गेली नाही. शिवाजी महाराज यांच्या नावे कर्जमाफी जाहीर केली मात्र शेतकऱ्यांना मदत काही मिळाली नाही, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे. त्यामुळे छत्रपतींचा महाराष्ट्र हे कदापी खपवून घेणार नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे  यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बेस्टचा संप मुंबईत अजूनही सुरूच, सामन्य नागरिकांचे आतोनात हाल