लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि भंडारा-गोंदिया येथे निवडणुका होत आहेत. भाजप साम-दंड-भेदाचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
भंडारा-गोंदिया येथे आचारसंहिता सुरू असताना धानावर पडलेल्या तुडतुडा रोगाची आर्थिक मदत मंजूर करून भाजप शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवत आहे. आचारसंहितेच्या काळात सरकारी निधी वाटता येत नाही. त्यामुळे भाजपने आचारसंहितेचा भंग केला असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले. भाजपला सरळ मार्गाने निवडणुका जिंकता येत नाही त्यामुळे हे कृत्य केले जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली असल्याची बतावणी मलिक यांनी केली. तसेच याप्रकारचे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने तोबडतोब कारवाई करायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका जिंकण्यासाठी साम-दाम-दंड- भेदचा वापर करण्याचा सल्ला दिल्याची ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. त्या क्लिपमध्ये मुख्यमंत्री थेट धमकी देत हल्ला करा असे म्हणत आहेत. धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपचा तपास करावा. पोलिसांना कारवाईचे आदेश द्यावे. गरज असेल तर फॉरेन्सिक लॅबमध्ये ही क्लिप पाठवून छाननी करावी अशी मागणी करत, शिवसेनेने जनतेत जाऊन नुसती पुंगी वाजवू नये, हिम्मत असेल तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी असे आव्हानही मलिक यांनी केले.