सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बैठकीत घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
ते म्हणाले, "महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठींबा असेल. आम्ही सर्व हे सरकार टिकवण्याचा प्रयत्न आहे. माझं मुख्यमंत्र्यांशीही बोलणं झालं. आदित्य ठाकरेंशीही बोलणं झालं आहे. मी सर्वांना समान निधी दिला आहे. पालकमंत्री नेमताना सर्व पक्षांना समान संधी दिली आहे. त्यांनी जर समोरासमोर येऊन सांगितलं असतं तर गैरसमज दूर झाले असते.
संजय राऊत यांनी हे वक्तव्य का केलं हे माहिती नाही. मी याबाबत उद्धव ठाकरेंना विचारेन की राऊतांनी असं वक्तव्य त्यांनी का केलं . पण काहीवेळा आमदारांना परत बोलावण्यासाठी असं बोललं जातं.
हा संपूर्ण घटनाक्रम उद्धव ठाकरे स्वतः घडवत आहेत का, यात किती तथ्य आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार यांनी ती शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले, "शिवसेनेबरोबर मी अडीच वर्षे काम करतोय त्यांचा तसा स्वभाव आहे असं वाटत नाही."
सरकार अडीच वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं तेव्हा 36 पालकमंत्री म्हणून तिन्ही पक्षांचे नेमले. कुणाच्याही आमदार निधीत काटछाट करण्यात आलेली नाही. कधीही दुजाभाव केला नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.
असं चॅनलला जाऊन बोलण्यापेक्षा हे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांपुढे बोलले असते तर समज-गैरसमज दूर झाले असते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये गेलोय. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. त्यांच्या वक्तव्यावर टीकाटिप्पणी करण्याचं काही कारण नाही. आपण व्यवस्थित यातून कसं बाहेर पडू, याचा प्रयत्न करतोय, असं अजित पवार यांनी म्हटलं.