Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेकापचे ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचे निधन

शेकापचे ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचे निधन
, सोमवार, 17 जानेवारी 2022 (15:49 IST)
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा एन डी पाटील यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. पण, त्यांची प्राणज्योत मालवली.
ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व लोप पावले आहे. समाजकारण, राजकारण, अर्थकारण यावर त्यांचा विशेष अभ्यास होता. गेल्या वर्षी मे मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी कोरोनाशी चांगली झुंज दिली. त्यात त्यांनी विजय मिळविला होता. झुंजार नेते आणि नेतृत्व अशीही त्यांची ओळख होती.
नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे संपूर्ण नाव होते. मात्र ते एन डी पाटील नावानेच ख्यात होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे १५ जुलै १९२९ रोजी झाला. त्यांनी पूणे विद्यापीठातून एम ए (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण (एलएलबी) घेतले.
साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये त्यांनी तीन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर ते इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे ते प्राचार्य झाले. विविध शिक्षण संस्थांवर त्यांनी मोठे काम केले. त्यानंतर ते शेकापमध्ये दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेकदा लढा दिला. महाराष्ट्राच्या विधीमंडळातही ते पोहचले. तेथे त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली. त्यांनी सहकार विभागाची धुरा मंत्रिमंडळात सांभाळली. कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यांना असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रीया विविध मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिरजू महाराज यांना श्रद्धांजली