छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीच्या छळाला कंटाळून 26 वर्षीय नवविवाहित डॉक्टरने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. प्रतिक्षा गवारे असे मृत महिलेचे नाव आहे. मृत्यूपूर्वी प्रतीक्षाने पती प्रीतम गवारे यांच्याविरोधात सुसाईड नोट टाकली असून या चिठ्ठीत तिने आत्महत्येसाठी पतीला जबाबदार धरले आहे. डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध हुंड्यासाठी मृत्यू आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करत त्याला पडेगावमधील सुंदरनगर भागातील त्याच्या नातेवाइकाच्या घरातून अटक केल्याची माहिती आहे. त्याच्या रशियाला पळून जाण्याचा प्लॅन होता.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रतीक्षा भुसारे हिचा विवाह पाच महिन्यांपूर्वी झाला होता. त्या छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने सात पानी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत तिने या पाऊलासाठी पतीला जबाबदार धरले आहे. पतीने छळ केल्याचा आरोप करत मृत महिलेने लिहिले की, तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. एवढेच नाही तर आरोपी त्याचे फोन कॉल रेकॉर्ड आणि मेसेजही तपासायचा.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते
पोलिसांनी जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये असे लिहिले आहे की
Dear Aaho..
खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती.
तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.
सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.
माझ्या मनीचे दुःख सारे कधी तु जाणवलेच नाही
पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही.
तुझ्याचसाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तु पहिले नाही
तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी चुंबले नाही
नशीब बांधले होते आपले, नाही त्यात षड्यंत्र काही
हा पण प्रेम होते आणि आहे (हे लिहून वाक्य खोडलं आहे)
दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही
मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्त्व नाही
तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही.
तुझ्याचपासून सुख माझे तुझ्याचसाठी सर्व काही
मी स्वत:ला हरवून आले, याचे मला दुःख नाही
तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही
तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही
तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.
तुमचीच
प्रतीक्षा (Dr Pratiksha Gaware)
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
मृत डॉक्टरच्या वडिलांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलीचा आरोपी पती, ज्याने रशियातून एमबीबीएस केले आहे, त्याला येथे स्वतःचे हॉस्पिटल उघडायचे आहे. त्यासाठी तो आपल्या मुलीवर तिच्या माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत असे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत डॉक्टरच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध हुंड्यासाठी मृत्यू आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.