महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, पालकांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत आणि जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हाच मुलांना शाळेत पाठवावे. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शाळा 24 जानेवारी म्हणेजच आजपासून कोविड-19 प्रोटोकॉलसह पुन्हा सुरू केल्या गेल्या आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, सोमवारपासून आम्ही शाळा पुन्हा सुरू करत असलो तरी विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक नाही. याबाबत पालक स्वतःचे निर्णय घेण्यास मोकळे आहेत आणि जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हाच त्यांनी मुलांना शाळेत पाठवावे.
मध्य वैतरणा धरणावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बांधलेल्या 100 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाबद्दल बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या मते, पालिकेने बांधलेला हा पहिलाच वीजनिर्मिती प्रकल्प आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त अक्षय हायब्रीड पॉवर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्रातील कोरोना प्रकरण
रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची 40,805 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 75,07,225 झाली. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या एका दिवसात साथीच्या आजारामुळे 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1,42,115 झाली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आज कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन फॉर्मशी संबंधित कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही.