Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसे आणि उबाठा सेनेच्या युतीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून देण्यात आलेला नाही

sandeep deshpande
, गुरूवार, 6 जुलै 2023 (20:48 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी शिवसेनेचं (ठाकरे गटाचं) मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या कार्यालयात आले होते. पानसे हे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांना भेटले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  यावेळी देशपांडे यांनी स्पष्ट केलं की, मनसे आणि उबाठा सेनेच्या युतीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून देण्यात आलेला नाही.
 
संदीप देशपांडे म्हणाले, युतीचा कोणाताही प्रस्ताव आमच्याकडून पाठवण्यात आलेला नाही. याआधी आम्ही २०१४ आणि २०१७ मध्ये उबाठा सेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. परंतु तेव्हा उबाठा गटाचा अत्यंत नकारात्मक प्रतिसाद होता. त्यामुळे आत्ता आम्ही प्रस्ताव देण्याचा विषय येत नाही.
 
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, दोन्ही पक्षांची युती व्हावी यासाठी आमच्याकडून दोन वेळा प्रयत्न झाला आहे. परंतु त्यांच्याकडून असा कोणताही प्रयत्न झाला नाही, ही गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे. तुम्ही कधी त्या भावाला (उद्धव ठाकरे) विचारलं आहे का? सगळे प्रश्न मनसेलाच का विचारता? कधी त्यांनाही विचारा. आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी तो का नाकारला? हेही विचारा त्यांना. दररोज सकाळी संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलतात, तेव्हा त्यांना विचारा.
 
ठाकरे गटाकडून मनसेला युतीचा प्रस्ताव आला तर मनसेची काय भूमिका असेल? असा प्रश्न विचारल्यावर संदीप देशपांडे म्हणाले, या जर-तरच्या गोष्टींना काही महत्त्व नाही. समजा असं झालं आणि त्यांच्याकडून युतीचा प्रस्ताव आला तर अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असे स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणता, महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार, शिरसाट यांचे विधान