ज्या व्यक्तीला आपला मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्या असण्यानसण्याने पक्षाला काहीच फरक पडणार नाही, असा हल्लाबोल भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने परळी येथील गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात पंकजा यांनी अप्रत्क्षपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. तसेच मी पक्ष सोडणार नाही, पण पक्षाने मला सोडावे का नाही, हा त्यांचा प्रश्न असल्याचे म्हटले. यावरुन काकडे यांनी पंकजा यांचा समाचार घेतला.
ते म्हणाले, पंकजा यांच्या कालच्या मेळाव्याला फारशा गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पुढे ते म्हणाले, पाच वर्षे मंत्री असूनही तिथल्या लोकसभेची खासदारकी कुटुंबात असूनही जी व्यक्ती 30 हजार मतांच्या फरकाने पराभूत होते. चाळीस वर्षे राजकारणात असूनही ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही. पंकजा यांनी कोणालाच जवळ केले नाही. मराठा समाज, मुस्लीम समाज, ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळेच ते पराभूत झाल्या आहेत.