आता कोयता गँगचं लोण साताऱ्यातही पसरलं असून आज पोलिसांनी या गँगवारला चांगलाच धडा शिकवला. पोवई नाका परिसरात हातात कोयता घेऊन रस्त्यावरून येजा करणाऱ्या लोकांच्या अंगावर उगारणाऱ्या कोयता गँगमधील पाच तरूणांना पोलिसांनी पकडले. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सयाजी महाविद्यालयासमोर काही तरूण सोमवारी रात्री उभे राहिले होते. त्यातील दोन तरूणांच्याहातात कोयता होता. हा कोयता हातात घेऊन ते जोरजोरात ओरडत होते. रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर कोयता उगारत होते. अशाप्रकारची त्यांची हुल्लडबाजी सुरू होती. या ठिकाणी दहा मिनिटे हे तरूण धिंगाणा घालत होते. तेथून ते पोवई नाक्यावर गेले. तेथील डीसीसी बॅकेजवळ उभे राहून त्यांचा पुन्हा धिंगाणा सुरू झाला. या प्रकाराची माहिती वाहतूक पोलिसांना समजल्यानंतर पोलिस तेथे पोहोचले. त्यावेळी संशयित तरूण तेथून पळ काढत असतानाच पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांच्या हातातील कोयता पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर त्यांना चार दोन फटके मारून पोलिस गाडीत घातले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती.
Edited By- Ratnadeep Ranshoor