Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दशकपूर्ती सोहळा: घुंगरांच्या नादात गुंफलेला १० वर्षांचा 'नृत्य सरगम कथक'चा दैदिप्यमान प्रवास!

Nritya Sarga Kathak Classes Ten Years Completed in Thane
काही कार्यक्रम हे कार्यक्रम म्हणून संपतच नाहीत. ते अनुभव म्हणून मनात रेंगाळत राहतात… आठवणींच्या पदन्यासारखे. नृत्यलंकार सौ. मनाली कुणाल मोहिते संचालित “नृत्य सरगम कथक क्लासेस”च्या दशकपूर्तीचा सोहळा असाच एक अनुभव ठरला—ज्यात ताल, लय, साधना आणि उत्सव या सगळ्यांचा सुरेल संगम होता.
 
दहा वर्षं… संख्या म्हणून पाहिलं तर साधी. पण कथकासारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारासाठी दहा वर्षं म्हणजे सातत्याची तपश्चर्या. रोजच्या रियाजात ओथंबलेला घाम, घुंगरांच्या नादात विरघळलेला थकवा, चुका सुधारताना मिळालेली नम्रता आणि प्रत्येक परफॉर्मन्सनंतर मिळालेली आत्मिक तृप्ती—या सगळ्याचं संचित म्हणजे हा दशकपूर्तीचा क्षण.
 
कार्यक्रमाची सुरुवातच कथकाच्या आध्यात्मिक नात्याची साक्ष देणारी होती. मंचावर उतरलेला पहिला ठेका म्हणजे जणू देवतेला केलेली नम्र वंदना. पायांची घडण, नजरांची स्थिरता, हातांची रेखीव भाषा—सगळं काही इतकं संयत आणि तरीही प्रभावी की प्रेक्षक नकळत त्या लयीच्या प्रवाहात वाहत गेले.
 
कथक लाइव्ह सादरीकरण हा या कार्यक्रमाचा आत्मा होता. लाईव्ह तबला, लाईव्ह लेहरा, पावलांशी संवाद साधणारा नाद—यामुळे कथक फक्त पाहण्याचा नव्हे, तर ऐकण्याचा आणि जाणवण्याचा अनुभव ठरला. प्रत्येक तिहाई संपताना येणारी टाळी ही दाद होती—मनातून उमटलेली.
 
यानंतर बॉलीवूड डान्स परफॉर्मन्स म्हणजे या दशकपूर्तीच्या सोहळ्याला लाभलेली उत्सवी रंगत. कथकाची शिस्त जपूनही आधुनिकतेशी साधलेला संवाद इथे स्पष्ट दिसत होता. अभिव्यक्ती मुक्त होती, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि प्रत्येक स्टेपमध्ये आत्मविश्वास चमकत होता.
 
हा भाग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, “कथक शिकणारी पिढी काळासोबत कशी चालते” याचं सुंदर दर्शन घडवत होता. गुरु शिष्य परंपरेचा एक सुंदर क्षण या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. डॉ. सौ. मंजिरी देव यांच्या शिष्या सौ. मनाली मोहिते यांनी अतिशय सुंदर असा धमार ताल सादर केला त्याला देव बाईंनी पढंत  ची साथ केली. कथक नृत्य परंपरेची गुरुशिष्य परंपरा किती सुंदर आणि आश्वासक आहे याचं अलौकिक आहे ते या कार्यक्रमात पहायला मिळालं.
 
पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी, या संपूर्ण कार्यक्रमाचा हायलाइट ठरलं ते म्हणजे डॉ. मंजिरी देव यांचं कथक नृत्य सादरीकरण... त्या मंचावर येणं म्हणजे जणू कथकाचं व्यक्तिमत्त्वच चालत येणं.  निखळ साधना  त्यांच्या प्रत्येक पदन्यासात  होती आणि अनुभवाची खोल छाप होती.
घुंगरांचा प्रत्येक नाद बोलका होता.
नजर थांबवत होती.
हात कथा सांगत होते.
त्यांचं नृत्य पाहताना जाणवत होतं—
कथक  केवळ नृत्य नाही, ती एक जीवनदृष्टी आहे.
तालाशी प्रामाणिक राहणं, वेळेचं भान ठेवणं आणि तरीही भावनांना मुक्त सोडणं—हे सगळं त्यांच्या सादरीकरणातून सहज उमटत होतं.
डॉ. मंजिरी देव यांच कथक म्हणजे गंभीरता आणि सौंदर्य यांचा समतोल. त्यांची प्रत्येक हालचाल  गुरू-शिष्य परंपरेला वाहिलेल नम्र नमन होतं. प्रेक्षकांसाठी तो परफॉर्मन्स केवळ दाद देण्याचा नव्हता, तर मन शांत करून पाहण्याचा क्षण होता.
webdunia
हा सोहळा फक्त भूतकाळाचं सेलिब्रेशन आणि भविष्याकडे नेणारा आश्वासक दृष्टीक्षेप होता. दहा वर्षांची वाटचाल सांगून गेली की नृत्य सरगम कथक क्लासेस  केवळ संस्था नाही, तर एक संस्कारपीठ आहे—जिथे फक्त नृत्य शिकवलं जात नाही, जगणं घडवलं जातं. डॉ. काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियम, ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून विदुषी काश्मिरा त्रिवेदी मॅम, आणि कथ्थक एक्सपोनंट डॉ. टीना तांबे या देखील उपस्थित होत्या.
शेवटी, पडदा पडला… टाळ्या थांबल्या…
पण मनात मात्र घुंगरांचा नाद अजूनही घुमत राहिला.
कदाचित म्हणूनच असे सोहळे महत्त्वाचे असतात—
ते क्षणभरासाठी नाही,
तर आयुष्यभरासाठी आपल्या आत काहीतरी उजळवून जातात.
webdunia
©®वृंदा दाभोलकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाण्यात तांदूळ व्यापाऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्यासह तिघांना अटक